आंतरराष्ट्रीय क्रीडांगणात बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक अशा खेळांसाठी ही सुविधा द्याव्यात; क्रीडा मार्गदर्शकांची मागणी

Foto

औरंगाबाद: अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात औरंगाबाद नजीकच्या करोडी येथे राज्यस्तरीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याला मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर वाळूजला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण तयार करण्यासाठीही भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या दोन्ही घोषणांचे क्रीडा क्षेत्रातून स्वागत होत आहे. मात्र वाळूजच्या क्रीडांगणात मैदानी खेळाबरोबरच जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन अशा खेळांच्याही उत्तम सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या औरंगाबादला मधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू निर्माण झाले आहेत. मात्र त्यामानाने क्रीडा सुविधा येथे निर्माण झाल्या नाहीत. विशेषता जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, क्रिकेट या खेळाकडे मोठ्या प्रमाणावर खेळाडूंचा ओढा आहे. अर्थसंकल्पाद्वारे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण मंजूर करण्यात आले. मात्र तेथे मैदानी खेळांची सुविधा निर्माण करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. सरकारच्या या निर्णयावर किडा रसिक नाराजी व्यक्त करीत आहेत. याबाबत महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन महासंघाचे उपाध्यक्ष शिरीष बोराळकर म्हणाले की, मराठवाड्यातील खेळाडूंसाठी हा अत्यंत चांगला निर्णय आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा येथे निर्माण होतील. त्याचा फायदा खेळाडूंना होणार आहे. मात्र मैदानी खेळांबरोबरच बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक, बुद्धिबळ यासह इतरही खेळांसाठी येथे सुविधा निर्माण केल करायला हव्यात. याबाबत लवकरच क्रीडा मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. राज्य जिम्नॅस्टिक असोसिएशनचे सचिव तसेच एशियन जिम्नॅस्टिक युनियनचे तांत्रिक समिती सदस्य मकरंद जोशी म्हणाले की, औरंगाबाद मध्ये अत्यंत दर्जेदार खेळाडू आहेत. या खेळाडूंना वाळूजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडांगणाचा फायदा होईल. याठिकाणी जिम्नॅस्टिक हॉल तयार करावा अशी मागणी आम्ही संघटनेतर्फे क्रिडा आयुक्तांना करणार आहोत.

 पांढरा हत्ती होऊ नये 
वाळूज येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण ही अभिमानाची बाब आहे. मात्र हे क्रीडांगण म्हणजे पांढरा हत्ती होऊ नये. येथील सुविधा आणि मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू  बनविण्यास महत्त्वाचे ठरेल यात शंका नाही.
- शिरीष बोराळकर 
राज्य उपाध्यक्ष, बॅटमिंटन असो.

संघटनांशी चर्चा करून निर्णय घ्यावा  मराठवाड्यातील क्रीडा संघटनांशी चर्चा करूनच सरकारने निर्णय घ्यावा. वाळूजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडांगणामध्ये मैदानी खेळांबरोबरच इतर  खेळासाठी उच्च दर्जाचे क्रीडांगण तयार करावे.
मकरंद जोशी
राज्य सचिव, जिम्नॅस्टिक असो.